
पुणे, 03 मे (हिं.स.)।
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा (डीपी) रद्द झाल्यानंतर प्राधिकरणाने हद्दीतील ८०० गावांसाठी स्ट्रक्चर प्लॅनला (संरचनात्मक आराखडा) तयार करण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे. अनेक दिवसांपासून फक्त चर्चेत असलेल्या स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्याचे काम प्रत्यक्षात येणार आहे. पीएमआरडीए हद्दीतील गावांच्या विकासासाठी तयार केलेल्या विकास आराखड्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
त्यानंतर मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जुना आराखडा रद्द करून, आधी स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्याचा निर्णय फेब्रुवारीत घेतला होता. यासाठी एमआरटीपी ॲक्टमध्येही विशेष बदल केले. त्यानुसार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात नगर विकास विभागाने प्राधिकरणाला स्ट्रक्चर प्लॅनचा इरादा जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
तसेच स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्यासाठी स्मिता कलकुटकी यांची नगर रचना अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेशही जारी केले होते. यानंतर शुक्रवारी प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्राधिकरणाच्या हद्दीचा स्ट्रक्चर प्लॅन तयार करण्याचा इरादा जाहीर केला. तसेच प्राधिकरणाच्या हद्दीचा नकाशाही प्रसिध्द केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु