
नांदेड, 03 मे (हिं.स.)।
एकीकडे ४३ अंश सेल्सिअस तापमानाने अंगाची लाही लाही होत असताना, दुसरीकडे जिल्ह्याच्या प्रमुख शासकीय आरोग्य केंद्रातच पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांची होत असलेली परवड ही प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे.
ग्रामीण भागातून मोठ्या आशेने उपचारासाठी येणारे गोरगरीब रुग्ण येथे पोहोचल्यावर प्रथमच पाण्यासाठी त्रस्त होत असल्याचे चित्र आहे. उन्हातून आलेले रुग्ण तहानेने कासावीस होत असताना रुग्णालयात साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे ही धक्कादायक बाब मानली जात आहे. परिणामी, अनेकांना पदरमोड करून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत असून ज्यांची आर्थिक ऐपत नाही, त्यांची अवस्था अधिकच बिकट होत आहे. शंभर खाटांचे हे
रुग्णालय असून येथे अपघात विभाग, सिटीस्कॅन, हिमोफिलिया उपचार, अतिदक्षता विभाग यांसह विविध सुविधा उपलब्ध आहेत. कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारलेली यंत्रणा आणि पुरेसा वैद्यकीय व नर्सिंग स्टाफ असतानाही पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा न देणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या निष्काळजीपणाविरोधात रुग्णांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 'औषध मिळाले नाही तरी चालेल, पण पाणी तरी मिळावे,' अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी दिली.
सरकार आरोग्य व्यवस्थेसाठी हजारो कोटींचा निधी खर्च करत असताना प्रत्यक्षात सामान्य रुग्णांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन रुग्णालय प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा रुग्ण व नागरिकांकडून दिला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis