
परभणी, 03 मे (हिं.स.)।
जिंतूर–परभणी रोडवरील माकपाटी परिसरात भीषण अपघात होऊन एका पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.पोलीस कर्मचारी गंगाधर शिंदे (वय ३५)रा. लहुजीनगर परभणी हे जिंतूरकडून परभणीकडे एमएच २२ वाय ९८७८ या क्रमांकाच्या दुचाकीने प्रवास करत होते. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा एस टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शिंदे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माकपाटी येथील हॉटेल ताईच्या समोर घडली. अपघात रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे जखमींना तात्काळ मदत मिळण्यात विलंब झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. काही वेळानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी मदतकार्य सुरू केले. गंगाधर शिंदे हे परभणी येथील पोलीस हेडक्वार्टरमध्ये कार्यरत होते. ते कर्तव्यदक्ष व शांत स्वभावाचे कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे पोलिस विभागावर शोककळा पसरली असून सहकाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, नवनाथ माणिकराव लोनस यांना डायल ११२ वरून या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणांना कळविले. माहिती मिळाल्यानंतर परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुंडलिक मोहिते व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली व पुढील कार्यवाही सुरू केली. मृतदेह पुढील तपासणीसाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis