
बीड, 03 मे (हिं.स.)। शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने शेत/पाणंद रस्त्यांचे सीमांकन, अतिक्रमण निर्मूलन व रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यासंबंधी प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.
सदर प्रस्तावांना मंजुरी देताना संबंधित रस्ता अतिक्रमणमुक्त असल्याबाबत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. तसेच रस्त्यासाठी जमीन उपलब्ध असल्यास संबंधित शेतकऱ्यांची लेखी संमती, नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
सर्व तहसीलदारांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तालुक्यातील शेत/पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव प्राप्त करून घ्यावेत, त्यातील त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव परिपूर्ण स्वरूपात मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच माजलगाव, वडवणी व धारूर तालुक्यांतील विविध शासकीय इमारतींसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत आढावा घेण्यात आला. संबंधित ठिकाणी सुचवलेल्या जागांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय माजलगाव शहरातील आठवडी बाजारासाठी बायपास रस्त्यालगत खाणकामासाठी संपादित केलेली शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती तातडीची पावले उचलावीत, असे निर्देश देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis