
बीड, 03 मे (हिं.स.)। उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून याचा गंभीर परिणाम दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जनावरांचा आहार, प्रजनन क्षमता आणि वाढ खुंटत असल्याचे चित्र असून विशेषतः संकरित जनावरांना उष्माघाताचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.
उन्हापासून बचावासाठी गोठ्यात पुरेशी हवा राहील याची काळजी घ्यावी आणि जनावरांना झाडांच्या सावलीत बांधून मुबलक हिरवा चारा व दिवसातून चार वेळा थंड पाणी द्यावे. म्हशी आणि संकरित गायींच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांच्यावर दिवसातून दोन-तीन वेळा पाण्याचा शिडकावा करणे आवश्यक आहे. जनावरांना उन्हामुळे येणारा अशक्तपणा टाळण्यासाठी पाण्याच्या हौदात गूळ आणि मीठ टाकण्याचा सल्लाही पशुसंवर्धन विभागाने दिला असून लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis