
सोलापूर, 03 मे (हिं.स.)।
शासकीय विश्रामगृह (डाक बंगला) म्हणजे जिथे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था असते. ज्या ठिकाणी सामान्य नागरिकांना साधे प्रवेशद्वारावरही उभे केले जात नाही, त्याच विश्रामगृहाला तेथील कर्मचाऱ्यांनी चक्क 'मोफत परमिट रूम' बनवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
सामान्य जनतेच्या टॅक्समधून लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या सोयी-सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, सोलापूरच्या याच विश्रामगृहात सुरक्षिततेचा आणि नियमांचा फज्जा उडवत कर्मचारी मद्यप्राशन करत असल्याचे समोर आले आहे. ज्या परिसरात सामान्यांना बंदी आहे, त्याच शांततेचा फायदा घेत हे कर्मचारी ड्युटीच्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या झोडत असल्याचे दिसून आले.
या बेकायदेशीर कृत्याचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजू प्याटी यांनी केला आहे. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हा सर्व प्रकार पुराव्यासह उघडकीस आणला. एकीकडे सामान्यांना नियमांचे डोस पाजायचे आणि दुसरीकडे सरकारी कर्मचारीच विश्रामगृहाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड