
बीड, 03 मे (हिं.स.)। वै. बंकटस्वामी महाराज यांच्या ८२ व्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता शनिवारीसंदीपान महाराज हसेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. तत्पूर्वी समाधी अभिषेक झाला.
यावेळी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे, महालिंग महाराज नागरे, सीताराम बाबा, महादेव महाराज चाकरवाडीकर, राम महाराज डोंगर, ज्ञानेश्वर माउली मंजरीकर, स्वामी स्वरूपानंद सरस्वती, स्वामी नरेश महाराज, नवनाथ महाराज जरूडकर, आमदार संदीप क्षीरसागर, आदींची उपस्थिती होती. संदीपान महाराज हासेगावकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या 'हरि बिन रहिया न जाए जिहिरा। कब की थाड़ी देखें राहा।' या काला प्रकरणातील अभंगावर चिंतन मांडले. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून भाविकांना शुभेच्छा देत या क्षेत्रविकासाला मदत करण्याचा शब्द दिला. वारकरी संप्रदायावर आलेले संकट आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वच बंकटस्वामींच्या दरबारात एकत्र येतात, असे संदीप क्षीरसागर म्हणाले. नेकनूर संस्थानच्या विकासात मुंदडा कुटुंब नेहमी प्रयत्नशील असल्याचे अक्षय मुंदडा यांनी सांगितले.
सप्ताहामध्ये ११० पोते साखर, ७० क्विंटल डाळ, तर ४७ टाकी तेल आणि एक हजार पोते मुरमुरे यापासून तयार केलेला प्रसाद वाटप करण्यात आला.
कीर्तनाला हजारो भाविकांच्या गर्दीन नेकनूर फुलले होते. प्रसाद वाटपासाठी महिला ग्रुपच्या हजार सदस्यांनी पुढाकार घेतला. तरुणांनी पार्किंग, पाणी, स्वच्छता, सुरक्षा, सर्व चोख व्यवस्था केली होती.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis