
अमरावती, 03 मे (हिं.स.)
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई-लायब्ररीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या आधुनिक लायब्ररीला ‘न्यायमूर्ती भूषण गवई ई-लायब्ररी’ असे नाव देण्यात आले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत.
डिजिटल युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने या ई-लायब्ररीची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सुमारे ७० संगणकांची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, सुमारे ३०० विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा थेट लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, स्पर्धा परीक्षा तयारी, ई-बुक्स, डिजिटल कंटेंट आणि विविध शैक्षणिक साधनांचा सहज वापर करता येणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता शहरांप्रमाणेच डिजिटल शिक्षणाच्या सुविधा मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळेल. ही ई-लायब्ररी केवळ अभ्यासासाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉ. प्रियंका विश्वकर्मा, न्यायाधीश अनिल किलोर, न्यायाधीश प्रविन पाटील तसेच खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच भव्य झाला.
चांदूर रेल्वे नगरपरिषदेचा हा उपक्रम शहराच्या डिजिटल आणि शैक्षणिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी