
नांदेड, 03 मे (हिं.स.)।
शहरातील हॉटेल, किराणा दुकाने व औषध विक्री केंद्रांमध्ये वाढत्या गैरप्रकारांविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत, नांदेड जिल्हा शाखेने अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन सादर करत तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल अ.भा. ग्राहक पंचायतीने दिलेल्या निवेदनात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदन दिल्यानंतर ग्राहक पंचायत पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त चट्टे व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक राठोड यांनी विविध मुद्द्यांवर सुमारे दीड तास सखोल चर्चा करत समस्यांची दखल घेतली. भविष्यात ग्राहक पंचायतच्या अपेक्षांनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. चर्चा सकारात्मक व सहकार्यपूर्ण वातावरणात पार पडल्याचे पदाधिकाऱ्यांनीसांगितले.
निवेदनात हॉटेलमध्ये शिळे अन्न देणे, अस्वच्छ स्वयंपाकघर, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले. किराणा दुकानांमध्ये अन्न भेसळीचे प्रकार वाढत असल्याचीही चिंता व्यक्त
करण्यात आली आहे.
औषध विक्री संदर्भात नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, नोंदणीकृत औषधतज्ज्ञाशिवाय व्यवहार, मुदतबाह्य औषधांची विक्री या प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः Pregabalin या औषधाची बिनचिठ्ठी विक्री होत असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. ग्राहक पंचायतीने औषध दुकानांची नियमित व अचानक तपासणी, परवाना व साठा नोंदींची पडताळणी, योग्य साठवणूक, तसेच प्रत्येक ग्राहकाला अधिकृत पावती देणे बंधनकारक करण्याची मागणी केली. याशिवाय बनावट औषधांची प्रयोगशाळेत तपासणी व औषध विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीकृत व्यवस्थान लागू करण्यावर भर देण्यात आला. तसेच, नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी व जनजागृती मोहीम राबवून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध सेवन टाळावे, असेही निवेदनात नमूद आहे. अ.भा. ग्राहक पंचायत नांदेड शाखेचे जिल्हाध्यक्ष रमेश मस्के, जिल्हा सचिव संतोष कुलकर्णी, जिल्हा सहसचिव अनुजा डोईफोडे व ग्राहक मार्गदर्शन प्रमुख रश्मी वडवळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने कागदोपत्री मर्यादित न राहता प्रत्यक्ष तपासणी मोहीम राबविल्यास नागरिकांना सुरक्षित अन्न व दर्जेदार औषधे मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis