
रत्नागिरी, 03 मे (हिं.स.) । पर्यावरणप्रेमी शाहनवाज शाह यांच्या ‘भू-समाधी आमरण उपोषण’ आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असा ठाम इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी-दक्षिण जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी दिला.
महाराष्ट्र दिनानिमित्ताने श्री. शहा यांनी हे आंदोलन केले होते. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने चर्चा केली. त्यानंतर प्रशासनाने गॅझेटेड अधिकाऱ्यांमार्फत लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानुसार ३१ मेपर्यंत खड्डे तयार करणे, ५ ते ७ फूट उंचीची झाडे उपलब्ध करून देणे आणि १५ जूनपर्यंत शास्त्रीय पद्धतीने वृक्षलागवड पूर्ण करणे या प्रमुख अटी मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा व मध्यभागी नियमानुसार वृक्षलागवड, सेंद्रिय खतांचा वापर, जाळी बसविणे आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचेही मान्य करण्यात आले आहे. या आश्वासनांची पूर्तता करावी, असा आग्रह श्री. कदम यांनी धरला आहे.
पूर्वीच्या वृक्षलागवडीत झालेल्या त्रुटींवर बोट ठेवत कदम यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी “लावलेली झाडे जगली नाहीत” अशी कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष या कामावर बारकाईने लक्ष ठेवणार असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांचे पालन केले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी एकजूट दाखवली असून, पुढील काळातही सजग राहून कामे पूर्ण करून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी