श्रीलंकेत धार्मिक उत्सवादरम्यान अपघात; ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
कोलंबो, 01 जून (हिं.स.)।श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे एक भीषण अपघात घडला आहे. कोलंबोच्या उपनगरात रविवारी बौद्ध धर्मातील प्रमुख वेसाक उत्सवादरम्यान भरधाव आणि नियंत्रण सुटलेल्या एका ट्रकने लोकांच्या गर्दीवर धडक दिल्याने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झा
श्रीलंकेत धार्मिक उत्सवादरम्यान अपघात; ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी


कोलंबो, 01 जून (हिं.स.)।श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे एक भीषण अपघात घडला आहे. कोलंबोच्या उपनगरात रविवारी बौद्ध धर्मातील प्रमुख वेसाक उत्सवादरम्यान भरधाव आणि नियंत्रण सुटलेल्या एका ट्रकने लोकांच्या गर्दीवर धडक दिल्याने सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता. त्याच अवस्थेत त्याने उत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या लोकांच्या गर्दीत ट्रक घुसवला. हा अपघात रविवारी रात्री कोलंबोजवळील मिगोडा परिसरात घडला. वेसाक उत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या मोफत अन्नवाटप केंद्राबाहेर मोठ्या संख्येने लोक रांगेत उभे होते. त्याच वेळी भरधाव पिकअप ट्रक गर्दीत घुसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ३५ ते ३८ वयोगटातील तीन पुरुष आणि १५ ते ५६ वयोगटातील तीन महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत एका लहान मुलासह १३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ४२ वर्षीय चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी अनेक किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. प्राथमिक तपासात तो मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे समोर आले आहे.

वेसाक हा बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण यांच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने श्रीलंकेभर श्रद्धाळूंमार्फत मोफत अन्न व पेयपदार्थांचे स्टॉल उभारले जातात, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते. पोलिसांनी सांगितले की, उत्सवादरम्यान तात्पुरत्या स्टॉल्सच्या परिसरात मोठी गर्दी आणि रस्त्याच्या कडेला वाहनांची पार्किंग यामुळे वाहतुकीवर ताण निर्माण होतो. त्यामुळे अशा ठिकाणी अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता असते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande