
जेरुसलेम , 02 जून (हिं.स.)।इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील प्रमुख शहरांवर जोरदार हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये निवासी भागांतील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच हा संघर्ष गाझा पट्ट्यापर्यंत आणखी विस्तारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या नबातीयेह शहरावर अनेक हवाई हल्ले केले आहेत. हिजबुल्लासाठी महत्त्वाचे धोरणात्मक केंद्र मानल्या जाणाऱ्या या शहराला इस्रायली सैन्याने अलीकडच्या काळात वेढा घातला आहे. सैन्य दल सातत्याने उत्तरेकडे पुढे सरकत आहेत.नबातीयेह जिल्ह्यातील विस्तीर्ण भागातही इस्रायली हल्ल्यांच्या बातम्या समोर आल्या आहेत. इस्रायल आसपासच्या परिसरावरील आपले नियंत्रण अधिक मजबूत करत असल्याचे दिसून येत आहे. ड्रोन हल्ल्यांमध्ये कफ्र सिर आणि अब्बा या गावांना लक्ष्य करण्यात आले. तसेच आणखी एका हल्ल्यात हौमिन अल-फौका येथे जाणाऱ्या रस्त्यावर निशाणा साधण्यात आला. इस्रायली हवाई हल्ल्यात याहमूर अल-शकीफच्या बाहेरील भागांनाही लक्ष्य करण्यात आले.
याशिवाय, वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य गाझातील अझ-झवायदा शहरावर झालेल्या इस्रायली ड्रोन हल्ल्यात एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. जखमींना देइर अल-बलाह येथील अल-अक्सा शहीद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये लागू झालेल्या युद्धविरामानंतरही इस्रायलने संपूर्ण गाझा पट्ट्यातील आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. या भागातील अनेक ठिकाणी हवाई हल्ले आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत
माहितीनुसार, दक्षिण लेबनॉनमधील टायर शहराच्या आकाशात इस्रायली लढाऊ विमाने सतत घिरट्या घालत आहेत. दिवसभर स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. गेल्या ७२ तासांत हिंसक हल्ल्यांची मालिका सुरू आहे. लेबनॉनच्या सैन्याने सांगितले की, नबातीयेह जिल्ह्यातील हबूश–देइर अल-झहरानी मार्गावर झालेल्या इस्रायली ड्रोन हल्ल्यात त्यांच्या दोन सैनिकांना दुखापत झाली. इस्रायली सैन्य सातत्याने नबातीयेह जिल्ह्यातील नागरिकांना शहर रिकामे करण्याचा इशारा देत आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, “हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेकडून युद्धविराम कराराचे उल्लंघन होत असल्यामुळे आम्हाला लष्करी कारवाई करणे भाग पडत आहे. नागरिकांनी तातडीने झहरानी नदीच्या उत्तरेकडील भागात स्थलांतर करावे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode