
लंडन, 01 जून (हिं.स.)। ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री यव्हेट कूपर यांनी लेबनॉनमधील इस्रायलची लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी हिजबुल्लाहने पूर्णपणे शस्त्रास्त्रांचा त्याग करावा आणि इस्रायलविरोधातील हल्ले बंद करावेत, असे आवाहनही केले आहे.
यव्हेट कूपर यांनी एक्सवरील संदेशात पश्चिम आशियातील वाढत्या हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करताना म्हटले की, “लेबनॉनमधील इस्रायलच्या लष्करी कारवायांमुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे, लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे, पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे आणि राजनैतिक तोडग्यासाठीची संधी कमी झाली आहे. हे थांबले पाहिजे.”त्यांनी सर्व संबंधित पक्षांनी युद्धविरामाचे पालन करावे आणि प्रामाणिकपणे चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही सांगितले.
दरम्यान, अरब लीगचे महासचिव अहमद अबुल घैत यांनीही लेबनॉनमधील इस्रायली कारवाईवर टीका करत तिला क्रूर आक्रमकता असे संबोधले आणि संघर्ष तात्काळ थांबवण्याची मागणी केली.अहमद अबुल घैत यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या भूभागात आणखी पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. दक्षिणेकडील गावांबरोबरच ऐतिहासिक स्थळांचेही नुकसान झाले आहे. तसेच नागरिकांना लक्ष्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विस्थापन झाले आहे. त्यांच्या मते, ही कारवाई लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. अबुल घैत यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला हस्तक्षेप करून इस्रायलची लष्करी मोहीम थांबवण्याचे आणि सुरक्षा परिषदेच्या ठराव क्रमांक 1701ची पूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.
जर्मनीनेही दक्षिण लेबनॉनमधील इस्रायलच्या जमीनी लष्करी मोहिमेच्या विस्ताराबाबत चिंता व्यक्त केली आहे. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वाडेफुल यांनी म्हटले की, “दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याची वाढती घुसखोरी ही गंभीर चिंतेची बाब आहे.” त्यांनी इशारा दिला की, कोणतीही अतिरिक्त लष्करी कारवाई आधीच तणावपूर्ण असलेल्या परिस्थितीला आणखी चिघळवेल आणि नव्या विस्थापनाला कारणीभूत ठरेल.
ब्रिटनचे मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका व्यवहार मंत्री हॅमिश फॉल्कनर यांनीही म्हटले की, लेबनॉनमधील सतत वाढणारा संघर्ष राजनैतिक प्रयत्नांना कमकुवत करत असून नागरिकांवर अस्वीकार्य परिणाम घडवत आहे. त्यांनी सांगितले, “हिजबुल्लाहने इस्रायलवरील हल्ले थांबवावेत आणि निरस्त्रीकरणाच्या दिशेने पावले उचलावीत. सर्व पक्षांनी युद्धविरामाचे पालन करावे आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चर्चेला पाठिंबा द्यावा.”
दरम्यान, कतारने आंतरराष्ट्रीय समुदायाला हस्तक्षेप करून इस्रायलवर दबाव आणण्याची आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयातील राज्यमंत्री मोहम्मद बिन अब्दुलअझीझ बिन सालेह अल-खुलैफी आणि लेबनॉनचे उपपंतप्रधान तारिक मित्री यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. या चर्चेत द्विपक्षीय सहकार्य तसेच लेबनॉनमधील सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode