
रायगड, 01 जून (हिं.स.)।
कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मौजे एकतानगर, दहिवली येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल २ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील लाकडी दरवाजाचा कोयंडा व कडी अज्ञात चोरट्यांनी उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी तसेच लाकडी कपाटातील लॉकर उघडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले.
चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी पाहणी करून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शरद रोकडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)