जवानाकडे ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या खंडणीबहाद्दर जेरबंद
जळगाव, 2 जून (हिं.स.) : जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मध्यस्थी केल्याचा बनाव करत सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात गुन
एफआईआर लोगो


जळगाव, 2 जून (हिं.स.) : जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मध्यस्थी केल्याचा बनाव करत सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या वयोवृद्ध वडिलांकडे 50 हजार रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना भोजे (ता. पाचोरा) येथील असून नीलेश नामदेव उबाळे याच्याविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोजे येथील रहिवासी आणि सध्या सैन्य दलात कार्यरत असलेले जवान विलास बाबूलाल जाधव यांनी 1 जून रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, भोजे शिवारातील एका प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारात आरोपीचा कोणताही संबंध नसतानाही त्याने स्वतःला मध्यस्थ म्हणून पुढे करून 50 हजार रुपयांची मागणी केली.

जवान जाधव यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने मोबाईलवरून वारंवार संपर्क साधत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ऑडिओ पुराव्यामुळे कारवाई सुलभ

आरोपीने केलेल्या धमक्या आणि शिवीगाळ याचे संभाषण जवान जाधव यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. हा ऑडिओ पुरावा पोलिसांना सादर करण्यात आला असून त्याच्या आधारे कारवाईला गती मिळाली.

या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले.

आणखी तक्रारींची शक्यता

नीलेश उबाळे याच्याविरोधात यापूर्वीही विविध शासकीय कार्यालये आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी, तसेच माहिती अधिकार अर्जांच्या माध्यमातून दबाव टाकून तडजोडी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी काही तक्रारी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पुढील तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande