
रायगड, 2 जून : खडी आणि सँड स्टोन विक्रीच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादातून कार्यालयात घुसून मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 1 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 12.45 वाजता कर्जत तालुक्यातील सावरगाव येथील एका कार्यालयात घडली. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात खडी व सँड स्टोन विक्रीवरून यापूर्वी वाद झाला होता. त्याच वादातून आरोपींनी कार्यालयात येऊन हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कार्यालयात घुसून हल्ला
फिर्यादीनुसार, आरोपी क्रमांक 1 याने कार्यालयातील खुर्ची फिर्यादीच्या अंगावर फेकून मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी पोलिसांना संपर्क करण्यासाठी मोबाईल काढत असताना आरोपी क्रमांक 2 याने त्यांच्या हातावर मारहाण करून दुखापत केली.
झटापटीदरम्यान कार्यालय व्यवस्थापकाला आरोपी क्रमांक 3 याने हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपी क्रमांक 4 याने खुर्चीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटाजवळ मारून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर आरोपी क्रमांक 5 ते 11 यांनी एकत्र येत फिर्यादीला शिवीगाळ करत धमकी दिली. “तुम्ही खडी व सँडचे भाव कसे वाढवले, तुमचा व्यवसाय आम्ही बंद पाडू,” अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 243/2026 नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत मारहाण, धमकी, बेकायदेशीर जमाव जमविणे आणि दंगल घडविण्याच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जयवंत काठे करीत आहेत.------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)