
डोंबिवली, 01 जून (हिं.स.)। भररस्त्यात वृद्ध महिलेच्या डोक्यात काठी मारून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढणाऱ्या तिघांना अटक करून गजाआड करण्यास विष्णूनगर पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,चिंतन सुनिल नंदा, (२० वर्षे, रा. सागर हाईटस बिल्डींग, पाचवा माळा, रूम क्रमांक ५०६, वेताळनगर, डोबिवली पश्चिम, मोहित सुनिल जाधव, ( १९ वर्षे, रा. रूम क्रमांक ४०४, श्री समर्थ कृपा, सत्यावान चौक, डोंबिवल पश्चिम) व स्वप्नील सुनील भोईर, (२७ वर्षे, रा. स्वप्नाचे घर, मोठागांव, रेतीबंदर क्रॉसरोड, डोंबिवली पश्चिम असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
या प्रकरणी सुगंध मंगल्या म्हात्रे या वयोवृद्ध महिलेच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.म्हात्रे या २४ मे रोजी सकाळी ५.२० वाजता गावदेवी जेटट्टी परिसरात फेरफटका मारत होत्या.अचानक दोन अनोळखी इसम त्यांच्या पाठीमागुन आले व त्यांच्यापैकी एकाने त्यांच्या डोक्यात काठीचा फटका मारल्याने त्या खाली पडल्या. सदर अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील २६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरी करून पळ काढला.
गुन्हा दाखल होताच विष्णुनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांनी तात्काळ आजुबाजूच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी केली, त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरून माहिती प्राप्त करून तपासकामी एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले.त्यांने सांगीतले की चिंतन सुनिल नंदा, रा. सागर हाईटस बिल्डींग, पाचवा माळा, रूम क्रमांक ५०६, वेताळनगर, डोबिवली पश्चिम, मोहित सुनिल जाधव, रा. रूम क्रमांक ४०४, श्री समर्थ कृपा, सत्यावान चौक, डोंबिवल पश्चिम तसेच त्याच्यासह इतर ५ विधीसंघर्षीत बालकांनी मिळून गुन्हा करण्यापूर्वी गुन्हयाची योजना आखुन त्यानंतर मोटार सायकलवरून रेकी करून सदरचा गुन्हा केल्याचे व गुन्हयातील जबरी चोरी केलेली सोन्याची चेन ही स्वप्नील सुनील भोईर, रा. स्वप्नाचे घर, मोठागांव, रेतीबंदर क्रॉसरोड, डोंबिवली पश्चिम, जिल्हा ठाणे यांच्या मार्फतीने विक्री केल्याचे सांगीतले. पोलिसांनी सदर गुन्हयात चिंतन, मोहित व स्वप्नील या तिघांना यांना २७ मे रोजी अटक केली. गुन्हयात निष्पन्न झालेल्या ६ विधीसंघर्षीत बालकांना तपासकामी ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळ, भिवंडी येथे हजर करण्यात आलेले आहे. गुन्हयाच्या तपासात आरोपींकडून जबरी चोरी केलेली २५.२८० ग्रॅम वजनाची १,००००० रू. किंमतीची सोन्याची चेन तसेच आरोपिंनी गुन्हा करताना वापरलेल्या दोन मोटार सायकली तपासकामी हस्तगत केल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi