20 रुपयांचा सापळा, दोन लाखांची चोरी! नेरळ हादरले
नेरळ, 11 जून (हिं.स.)। साईनाका परिसरात 20 रुपये पडल्याचे सांगून किराणा व्यापाऱ्याचे लक्ष विचलित करत दोन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर
A trap set with 20 rupees, a theft of two lakhs! Neral shaken.


नेरळ, 11 जून (हिं.स.)। साईनाका परिसरात 20 रुपये पडल्याचे सांगून किराणा व्यापाऱ्याचे लक्ष विचलित करत दोन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता नेरळ पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

घटनेनुसार, कोल्हारे येथील रहिवासी असलेले फिर्यादी साईनाका परिसरातील त्यांच्या दुकानाबाहेर बसले असताना दोन अनोळखी इसमांनी तुमचे 20 रुपये पडले आहेत असे सांगून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवले. फिर्यादी नोट उचलण्यासाठी वाकताच चोरट्यांनी दोन लाख रुपये असलेली पिशवी लंपास केली.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. साईनाका, बाजारपेठ परिसर, महामार्गावरील कॅमेरे तसेच खासगी आस्थापनांमधील चित्रफितींची पाहणी करून संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, चोरीनंतर आरोपी कोणत्या दिशेने पसार झाले, त्यांनी दुचाकी अथवा अन्य वाहनाचा वापर केला का, याचाही शोध घेतला जात आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सराईत टोळ्यांचा सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून जुन्या गुन्हेगारांची माहितीही तपासली जात आहे.

दिवसा गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी मोठी रोकड उघड्यावर न ठेवण्याबाबत तसेच अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर लगेच विश्वास न ठेवण्याबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक भास्कर गच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande