डंपरने चिरडल्याने आजोबांचा मृत्यू; नात थोडक्यात बचावली
जळगाव, 11 जून (हिं.स.)भुसावळ तालुक्यातील वरणगाव जवळील तपत कठोरा येथील पिंप्रीसेकम शेती शिवार रस्त्यावर एक दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली. डंपर मागे (रिव्हर्स) घेत असताना पाठीमागे असलेली दुचाकी डंपरखाली दाबल्या गेल्याने आजोबांचा जागीच मृत्यू झ
डंपरने चिरडल्याने आजोबांचा मृत्यू; नात थोडक्यात बचावली


जळगाव, 11 जून (हिं.स.)भुसावळ तालुक्यातील वरणगाव जवळील तपत कठोरा येथील पिंप्रीसेकम शेती शिवार रस्त्यावर एक दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली. डंपर मागे (रिव्हर्स) घेत असताना पाठीमागे असलेली दुचाकी डंपरखाली दाबल्या गेल्याने आजोबांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या भीषण अपघातात त्यांची चार वर्षांची नात सुदैवाने सुखरूप बचावली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित डंपरला आग लावून पेटवून दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपतकठोर्याचे रहिवासी आनंदा मुकुंद पाटील (55) हे आपल्या चार वर्षांच्या नातीसोबत पिंप्रीसेकम शिवारातील शेतातून दुचाकी (एम.एच. 19 बी 9320) ने घरी परतत होते. त्याच वेळी रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू असलेला डंपर (एम.एच. 19 ई.यू. 3737) हा अरुंद रस्त्यावर मागे येत होता व या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आनंदा पाटील हे डंपरखाली चिरडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला मात्र त्यांच्या बाजूला बसलेली लहान नात परी ही प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावली. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. निष्पाप आजोबांचा मृत्यू झाल्याचे पाहून गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. संतप्त झालेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त डंपरला जागेवरच आग लावून पेटवून दिले. काही वेळातच डंपरने भीषण पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच वरणगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब (अग्निबंब) तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून डंपरला लागलेली आग विझवली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी पाठवला आहे. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande