लातूर बसस्थानकात सोनसाखळी चोरीचा भंडाफोड; ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 11 जून (हिं.स.) :शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. अर्चना अजय भोसले (वय २६, रा. गावठाण, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असू
पोलीस कारवाई


लातूर, 11 जून (हिं.स.) :शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे. अर्चना अजय भोसले (वय २६, रा. गावठाण, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तिच्याकडून ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही घटना ९ जून २०२६ रोजी रात्री ९:४५ च्या सुमारास घडली. फिर्यादी स्वाती अनंत धुळे (रा. बस्तापुरे नगर, लातूर) या आपल्या आईला पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये सोडण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात आल्या होत्या. आईला बसमध्ये बसवल्यानंतर खाली उतरत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांनी विशेष पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी महिलेला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने चोरलेले १० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत सुमारे ७०,००० रुपये) काढून दिले. तसेच तिच्याकडून गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका गुन्ह्याची (गु.र.नं. ४२/२६) कबुली मिळाल्याने ती सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि प्रमोद देशमुख, सफौ कांदे, राजेंद्र टेकाळे, राम गवारे, संतोष गिरी, रविसन जाधव, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे, पदमाकर सुरवसे, महादेव फुले, सचिन जाधव, महिला पोलीस अनुराधा डोंगरे, सुमन कोरे आणि चालक युनूस शेख यांच्या पथकाने सहभाग घेतला.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande