जळगाव - घरामध्ये लपवून ठेवलेला लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त
जळगाव, 11 जून (हिं.स.)महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात पारोळा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २ लाख ५६ हजार १४१ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे तलाठी कॉलन
जळगाव - घरामध्ये लपवून ठेवलेला लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त


जळगाव, 11 जून (हिं.स.)महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याची अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात पारोळा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २ लाख ५६ हजार १४१ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे तलाठी कॉलनी परिसरातील एका घरावर टाकलेल्या छाप्यात ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांना तलाठी कॉलनीतील एका घरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासणीदरम्यान घरामध्ये विविध पोत्यांमध्ये लपवून ठेवलेला गुटखा आणि पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत विमल पानमसाला, राजनिवास, व्ही-१ टोबॅको, कर्मचंद गुटखा आणि केसी गुटखा या विविध ब्रँडचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची बाजारमूल्य अंदाजे २.५६ लाख रुपये इतकी असून पोलिसांनी तो ताब्यात घेत सील केला आहे. या प्रकरणी कैलास गणेश चौधरी (वय ३८, रा. तलाठी कॉलनी, पारोळा) याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक फायद्यासाठी बंदी असलेल्या गुटखा व पानमसाल्याचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande