
पुंछ, 12 जून (हिं.स.) : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ प्रशिक्षण सत्रादरम्यान चुकून ग्रेनेडचा स्फोट झाल्याने भारतीय सैन्याचे दोन जवान जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सीमेलगतच्या अग्रभागी असलेल्या भागात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जवान सीमावर्ती परिसरात प्रशिक्षण सराव (ट्रेनिंग एक्सरसाइज) करत असताना अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला. या भागात यापूर्वीही प्रशिक्षण आणि लष्करी कारवायांदरम्यान अशा प्रकारच्या अपघाती स्फोटांच्या घटना घडल्याची नोंद आहे.घटनेनंतर जखमी जवानांना तात्काळ घटनास्थळावरून बाहेर काढून जवळील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यांच्या दुखापतींच्या तीव्रतेबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.दरम्यान, सुरक्षा यंत्रणा आणि सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली असून स्फोट नेमका कोणत्या परिस्थितीत झाला याची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी