

नवी दिल्ली, 12 जून (हिं.स.)। एआय-नेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन्स कंपनी 'अवतार'ने भारतातील पुढील पिढीच्या वापरकर्त्यांसाठी अत्याधुनिक व्हिडिओ एआय परवडणारे, सुलभ आणि सुसंगत बनवण्यासाठी वार्या नावाचे एक डिस्टिल्ड व्हिडिओ मॉडेल विकसित केले आहे.भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन आणि 'अवतार'च्या अग्रणी चमूच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत आज या एआय प्रणालीचा प्रारंभ केला.
वार्या ही एक सर्वसामान्य संकल्पना नसून भारतातील अनेक क्षेत्रांना विचारात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. भारताचे विविध प्रदेश, सण, समुदाय, खाद्यसंस्कृती, पेहराव, सार्वजनिक ठिकाणे आणि दैनंदिन जीवन यांमधील सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध दृश्यांचे आकलन करून घेण्यासाठी आणि त्यानुसार ती तयार करण्यासाठी हे मॉडेल विकसित केले गेले आहे. एखाद्या गावातील वर्गात दृश्य स्वरुपातील धडा तयार करणाऱ्या शिक्षकापासून ते उत्पादनांच्या जाहिराती बनवणाऱ्या एमएसएमई उद्योगांपर्यंत, आणि व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक माहिती मिळवणाऱ्या नागरिकापर्यंत, एका साध्या कल्पनेचे एका चलचित्र कथेत रूपांतर करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
स्वदेशी पायाभूत एआय क्षमता विकसित करण्यासाठी 'इंडिया एआय मिशन'द्वारे निवडण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये 'अवतार'चा (Avataar) समावेश होता. सवलतीच्या दरातील राष्ट्रीय एआय कॉम्प्युट इन्फ्रास्ट्रक्चरच्या उपलब्धतेमुळे वार्याच्या संशोधनाला गती मिळाली, जे सार्वजनिक एआय पायाभूत सुविधा कशा प्रकारे देशांतर्गत नवसंशोधनाला वेग देऊ शकतात याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
'इंडिया एआय मिशन'च्या पाठिंब्याने विकसित करण्यात आलेल्या वार्यामध्ये एका डिस्टिलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जे व्हिडिओच्या गुणवत्तेशी तडजोड न करता व्हिडिओ निर्मितीची प्रक्रिया 50 स्टेप्सवरून थेट 4 स्टेप्सवर आणते. 'अवतार' अंतर्गत इन्फरन्स-कॉस्ट बेंचमार्क्सनुसार, वार्या केवळ 0.48 रुपये प्रति सेकंद या दराने व्हिडिओ तयार करू शकते, ज्यामुळे ते अनेक आघाडीच्या जागतिक व्हिडिओ मॉडेल्सच्या तुलनेत 10 पटीपर्यंत अधिक किफायतशीर ठरते.
'इंडिया एआय मिशन' अंतर्गत पाठबळ मिळालेल्या पायाभूत मॉडेल्सपैकी एकाचा शुभारंभ हा भारताच्या एआय प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. वार्या हे अशा संशोधन-आधारित क्षमता निर्मितीचे प्रतिनिधित्व करते ज्याला आम्ही सक्षम करू इच्छितो.” असे या शुभारंभ प्रसंगी बोलताना सचिव एस. कृष्णन यांनी सांगितले.
यावेळी 'अवतार'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक स्रवंथ अलुरु म्हणाले, “भारताची एआय क्षेत्रातील संधी केवळ सर्वात मोठ्या मॉडेल्सवरून ठरवली जाणार नाही, तर ती सर्वात कार्यक्षम मॉडेल्सद्वारे देखील परिभाषित केली जाईल. वार्या हे सिद्ध करते की अत्याधुनिक गुणवत्तेचे व्हिडिओ एआय नाट्यमयरीत्या अधिक कार्यक्षम आणि सुलभ बनवले जाऊ शकते. 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या देशासाठी, परवडणारी किंमत हे केवळ एक वैशिष्ट्य नसून, ती एक पूर्वअट आहे. आमचा असा विश्वास आहे की पुढील अब्जावधी कथा, धडे, जाहिराती, सेवा आणि अनुभव एआयच्या माध्यमातून तयार केले जातील आणि या क्षमता केवळ मोजक्या लोकांसाठीच नाही, तर प्रत्येकासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule