
मुंबई, 12 जून (हिं.स.) : काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र प्रादेशिक पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ किंवा त्यांच्या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राज्य व राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये संभाव्य फूट आणि त्यानंतर मूळ काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांनी या घडामोडींना अधिक वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे आणि या प्रक्रियेचे नेतृत्व त्यांनी करावे, असे मत व्यक्त केले. 2029 च्या निवडणुकांपूर्वी भाजपविरोधात व्यापक आघाडी उभी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव पूर्वीच शरद पवार यांनी दिला होता, मात्र काही कारणांमुळे त्यावर निर्णय झाला नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सेक्युलर मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्व समान विचारधारेच्या पक्षांनी एकत्र यावे, अशी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सावध भूमिका घेत, हे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगितले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयमित प्रतिक्रिया देत, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. मात्र या चर्चांबाबत कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी सूचित केले.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनीही स्पष्ट केले की काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही आणि अशा चर्चांमध्ये तथ्य नाही.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असला तरी अद्याप कोणतीही अधिकृत प्रक्रिया किंवा प्रस्ताव समोर आलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी