
सोलापूर, 12 जून (हिं.स.)।
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 20 नोव्हेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार ॲट्रॉसिटी अधिनियमांतर्गत खून किंवा मृत्यू झालेल्या पीडितांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे.दिवंगत दत्ता लक्ष्मण खंदारे यांच्या खूनप्रकरणी अक्कलकोट एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 926/2020 दाखल असून हा गुन्हा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील पात्र वारसदारांचा शोध घेण्यात येत असला तरी अद्याप त्यांची माहिती उपलब्ध झालेली नाही.दिवंगत खंदारे यांची पत्नी, अपत्य किंवा अन्य कायदेशीर वारसदार असल्यास त्यांनी जाहीर सूचनेच्या प्रसिद्धीपासून 15 दिवसांच्या आत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे संपर्क साधून वारसत्व सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावीत. वारस प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म दाखला, रेशन कार्ड तसेच इतर संबंधित पुरावे आवश्यक राहतील.निर्धारित मुदतीत कोणताही दावा किंवा हरकत प्राप्त न झाल्यास उपलब्ध नोंदींच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर प्राप्त होणारे दावे किंवा हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड