
नांदेड, 13 जून (हिं.स.)।
आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सदर उपक्रमांतर्गत योगाचा प्रसार, जनजागृती तसेच नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर ऑनलाइन योग सत्र 14 जून, 2026 रोजी सकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत आयोजित करण्यात येणार असून, या उपक्रमाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस असल्याचे या उपक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, भारत सरकार व हॅबिल्ड हेल्थटेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
सदर योग सत्राचे प्रक्षेपण आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्युब प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे. उपक्रमामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी इच्छुकांनी टोल फ्री क्रमांक 1800-315-7008 वर मिस्ड कॉल देऊन पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित सहभागीस सत्राची लिंक व आवश्यक सूचना संदेशाद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकषांनुसार प्रत्येक सहभागीने स्वतःच्या स्वतंत्र डिजिटल उपकरणावरून (मोबाईल / लॅपटॉप/ टॅब) सत्रात लॉग-इन करणे आवश्यक राहील. नोंदणीकृत प्रत्येक उपकरणाची स्वतंत्र सहभाग नोंद ग्राह्य धरण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयातील विविध क्रीडा संघटनेचे खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, पदाधिकारी, विद्यापीठे, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था व इतर संबंधित यंत्रणांना तसेच, योगविषयक जनजागृती, प्रचार व प्रसार कार्यामध्ये कार्यरत विविध संस्था, संघटना, शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (NCC), नेहरू युवा केंद्रे, स्वयंसेवी संस्था तसेच औद्योगिक आस्थापना यांना आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याबाबत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्फत आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis