
अमरावती, 12 जून, (हिं.स.)। शेताच्या धुऱ्यावरून (बांधावरुन) झालेल्या वादातून चांदूरबाजार तालुक्यातील निंभोरा येथे एका शेतकऱ्याने शेजाऱ्याची 7 संत्र्याची झाडे तोडून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित शेतकरी देविदास गायकी आणि आरोपी हेमंत अवघड यांची शेती निंभोरा येथे एकमेकांच्या शेजारी आहे. दोघेही वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत. धुऱ्यावरून वाद झाल्यानंतर हेमंत अवघड यांनी रागाच्या भरात देविदास गायकी यांच्या बागेतील 7 संत्र्याची झाडे तोडून टाकली. लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.वर्षानुवर्षे जपलेली बाग उदध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी देविदास गायकी यांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलिसांनी हेमंत अवघड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून देविदास गायकी यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याच्या कष्टावर घाला घालणारी ही घटना तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी