
चंद्रपूर, 12 जून (हिं.स.) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने कोरपना येथील स्व. भाऊराव चटप माध्यमिक आश्रमशाळा येथे विरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आदिवासी महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासह विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी विवेक राचेलवार होते. यावेळी कोरपना तहसीलदार पल्लवी आखरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रतिनिधी निलीमा घरट तसेच उमेद अभियानाचे मोहित नैताम यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात विकास राचेलवार यांनी आदिवासी विकास विभागामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. आदिवासी महिलांचे स्वतंत्र बचत गट स्थापन करून उमेद आणि माविम यांच्या सहकार्याने त्यांना प्रशिक्षण व वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनांमधून आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
विरांगना राणी दुर्गावती योजनेअंतर्गत नवीन महिला बचत गटांची स्थापना करून १०० टक्के अनुदानाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करत महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर बनावे, असे राचेलवार यांनी नमूद केले.
तहसीलदार पल्लवी आखरे यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यांची माहिती दिली. पात्र महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी ‘माझी कन्या/सखी वन स्टॉप सेंटर’ योजनेंतर्गत कौटुंबिक हिंसाचार किंवा अत्याचारग्रस्त महिलांना मिळणाऱ्या वैद्यकीय मदत, कायदेशीर सल्ला आणि समुपदेशन सेवांबाबत मार्गदर्शन केले.
याशिवाय जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रतिनिधींनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याची माहिती दिली. तर उमेद अभियानाचे मोहित नैताम यांनी ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार, बिनव्याजी कर्ज, मोफत प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्धतेसंबंधी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ यांनी केले. संचालन प्राथमिक शिक्षिका प्रिती कुत्तरमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प अधिकारी राजीव बोंगीरवार यांनी केले. मेळाव्यास विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
----------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव