
चंद्रपूर, 12 जून, (हिं.स.)। चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे मुन्ना बिझन तावाडे यांनी त्यांच्या मालमत्ता कर नोंदणीसंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर विविध आरोप करण्यात आले होते. मात्र, महानगरपालिकेने सदर प्रकरणाची सखोल पडताळणी केली असता तक्रारीतील आरोप वस्तुस्थितीशी विसंगत व निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिकेच्या नोंदीनुसार संबंधित मालमत्ता सन 2024 मध्ये खरेदी करण्यात आली असून ती आधीपासूनच फेरफार व्यवहारांतर्गत नोंदणीकृत होती. मालमत्ता कर नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला अधिपत्यवहीत बदल करण्याचा अर्ज संबंधितांकडून सादर करण्यात आलेला नव्हता. तसेच मालमत्तेचे मोजमाप करून नोंदणी करताना निर्धारित नियम व कार्यपद्धतीचे पालन करण्यात आले आहे.
सदर ठिकाणी सार्वजनिक श्री हनुमान आखाडा अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मालमत्तेच्या आकारणी प्रक्रियेत काही आक्षेप असल्यास संबंधितांना आक्षेप नोंदविण्याची व सुनावणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, संबंधितांकडून कोणताही आक्षेप अर्ज सादर करण्यात आलेला नाही. महानगरपालिकेच्या नोंदीप्रमाणे मालमत्ता धारकांच्या हक्कांचे संरक्षण करतानाच सार्वजनिक जागांच्या नोंदी व कर आकारणी नियमांनुसार करण्यात येते. त्यामुळे सार्वजनिक आखाड्याच्या जागेबाबत करण्यात आलेली नोंद ही प्रचलित नियमांनुसारच करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, एखाद्या मालमत्तेच्या मालकीबाबत अथवा ताब्याबाबत वाद असल्यास त्याचे निराकरण करणे हे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित पद्धतीने अर्ज सादर करणे अपेक्षित असते. सदर प्रकरणात आवश्यक अर्ज सादर करण्यात आलेला नसल्याने तक्रारीतील आरोपांना कोणताही तथ्याधार आढळून आलेला नाही.
त्यामुळे मुन्ना तावाडे यांनी केलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नसून महानगरपालिकेने ते फेटाळून लावले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव