
चंद्रपूर, 12 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अखत्यारित असलेले एक महत्वाचे कार्यालय आहे. शालेय स्तरावर विदयार्थ्यांना मराठी विश्वकोशाची ओळख व्हावी व सामान्य ज्ञान मिळावे, याकरीता इयत्ता नववीच्या मराठीच्या पाठयपुस्तकात मराठी विश्वकोशावर आधारित एका पाठाचा समावेश करून मंडळाच्या वतीने इयत्ता नववीमधील विदयार्थ्यांसाठी दरवर्षी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेमध्ये मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील विश्वभारती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विश्वभारती विद्यालयाची ममता कोसारे व सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकाविला तर याच विद्यालयातील वैभव पोहोणकर या विद्यार्थ्याने व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक अजय पवार व सौरव बोरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट व ३ हजार रुपये रक्कमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, तहसीलदार प्रिया कवळे यांच्यासह शाळेतील शिक्षक अजय पवार, सौरभ बोरकर तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव