युरिया खतासाठी दर्यापूरात शेतकऱ्यांच्या रांगा; भर उन्हात तासनतास प्रतीक्षा
अमरावती, 12 जून (हिं.स.) खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या कामांना वेग आला असताना युरिया खताच्या खरेदीसाठी दर्यापूर येथील सहकारी शेतकरी सोसायटीसमोर शेतकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खत उपलब्ध करून घेण्यासाठी परिसरात
युरिया खतासाठी दर्यापूरात शेतकऱ्यांच्या रांगा; भर उन्हात तासन्तास प्रतीक्षा


अमरावती, 12 जून (हिं.स.) खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या कामांना वेग आला असताना युरिया खताच्या खरेदीसाठी दर्यापूर येथील सहकारी शेतकरी सोसायटीसमोर शेतकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खत उपलब्ध करून घेण्यासाठी परिसरातील अनेक गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सोसायटीत दाखल झाल्याने येथे गर्दी उसळली आहे.

खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व तयारी सुरू असून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताची मागणी वाढली आहे. मात्र जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे उपलब्ध खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सकाळपासूनच रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक शेतकरी लवकर क्रमांक लागावा म्हणून पहाटेपासूनच सोसायटी परिसरात दाखल होत असल्याचे दिसून आले.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. अशा कडक उन्हात शेतकऱ्यांना तासन्तास उभे राहावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः ज्येष्ठ शेतकरी आणि महिलांना उष्णतेचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा बसण्याची सोय उपलब्ध नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला.यावेळी काही शेतकऱ्यांनी प्रशासन आणि कृषी विभागाकडे नाराजी व्यक्त करत खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच खतासाठी अशी धावपळ करावी लागत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वेळेवर खत मिळाले नाही तर पिकांच्या व्यवस्थापनावर परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

दर्यापूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने युरिया खताचा पुरेसा पुरवठा करावा तसेच खत वितरण केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी खताचा नियमित आणि पुरेसा साठा उपलब्ध होणे अत्यावश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande