
मेक्सिको सिटी, 12 जून (हिं.स.) : यजमान मेक्सिकोने फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेची दमदार सुरुवात करत पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या मेक्सिकोने संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखत विजयासह मोहिमेला सुरुवात केली.
एझ्टेका स्टेडियमवर झालेल्या उद्घाटन सामन्यात मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आले होते. जुलियन क्विनोनेस आणि राऊल जिमेनेझ यांच्या गोलांच्या जोरावर मेक्सिकोने महत्त्वाचे तीन गुण मिळवले. हा सामना पाहण्यासाठी 80,824 प्रेक्षक उपस्थित होते आणि त्यांनी स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचा मनमुराद आनंद घेतला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच मेक्सिकोने आक्रमक खेळ करत दक्षिण आफ्रिकेवर दबाव कायम ठेवला. त्याचा फायदा त्यांना नवव्या मिनिटाला मिळाला, जेव्हा सौदी लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जुलियन क्विनोनेसने गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
पहिल्या सत्रातील आघाडी कायम राखत मेक्सिकोने दुसऱ्या सत्रातही पकड मजबूत ठेवली. 66व्या मिनिटाला अनुभवी स्ट्रायकर राऊल जिमेनेझने शानदार हेडरद्वारे दुसरा गोल नोंदवला आणि संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. हा जिमेनेझच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 46वा गोल ठरला. यासह त्याने मेक्सिकोचा दिग्गज स्ट्रायकर जारेड बोर्गेटीच्या विक्रमाची बरोबरी केली. आता तो देशाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू जेव्हियर “चिचारितो” हर्नांडेझ याच्या केवळ 6 गोल्सनी मागे आहे.कोलंबियात जन्मलेला 29 वर्षीय फॉरवर्ड जुलियन क्विनोनेस हा मेक्सिकोसाठी विश्वचषक पदार्पण करणाऱ्या 6 खेळाडूंमध्ये होता. 2022 कतार विश्वचषकात गट टप्प्यातच बाहेर पडलेल्या मेक्सिकोसाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना निराशाजनक ठरला. त्यांच्या पुढील सामन्यात त्यांचा सामना झेक प्रजासत्ताकाशी होणार असून तो पुढील गुरुवारी अटलांटा येथे खेळवला जाईल.सामन्यादरम्यान शिस्तभंगाशी संबंधित काही वादही पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेचे स्पेफेलो सिथोल आणि थेम्बा झ्वाने यांना लाल कार्ड दाखवण्यात आले, त्यामुळे संघाला सामना 9 खेळाडूंनी पूर्ण करावा लागला. तर दुखापत-वेळेत मेक्सिकोचा बचावपटू सीझर मॉन्टेसलाही लाल कार्ड मिळाले.फिफा विश्वचषक 2026 अनेक कारणांनी ऐतिहासिक मानला जात आहे. प्रथमच 48 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. यंदाच्या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिका यांच्याकडे आहे.
नेत्रदीपक ठरला उद्घाटन सोहळा
दरम्यान एझ्टेका स्टेडियमवर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात कोलंबियन गायिका आणि नृत्यांगना शकिरा हिने आपल्या शानदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिने बर्ना बॉय याच्यासोबत विश्वचषकाच्या अधिकृत गीतांपैकी एक असलेले डाय-डाय हे गाणे सादर केले.विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी भव्य फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. 70 हजारांहून अधिक प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी असा नेत्रदीपक सोहळा यापूर्वी क्वचितच पाहिला असेल.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी