
श्रेयस हेकरे नाबाद १४८, दिव्येश साळवेचे सामन्यात ९ व रणवीर रोकडेचे ८ बळी
नाशिक, 12 जून (हिं.स.)।
- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित साफल्य पुरस्कृत, १६ वर्षांखालील वयोगटातील एन डी सी ए साफल्य १६ वर्षांखालील क्रिकेट ट्रॉफीचे विजेतेपद नाशिक जिमखाना संघाने मिळवले. अंतिम फेरीच्या दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिक जिमखानाने केन्सिंगटन क्रिकेट अकादमी वर २१६ धावांनी मोठा विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. नाशिक जिमखानाच्या विजयात सलामीवीर श्रेयस हेकरे आणि डावखुरे फिरकी गोलंदाज दिव्येश साळवे व रणवीर रोकडे यांनी प्रमुख वाटा उचलला.
महात्मानगर क्रिकेट मैदानावर झालेल्या झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत नाशिक जिमखानाने सलामीवीर श्रेयस हेकरेच्या जोरदार २१७ चेंडूतील नाबाद १४८ धावांच्या जोरावर पहिल्या डावात २४९ धावा केल्या. श्रेयसच्या खालोखाल आराध्य मुर्तडकने २१ धावा केल्या. केन्सिंगटनच्या सार्थक थोरातने ५ व फरहान खानने ४ बळी घेतले. उत्तरादाखल नाशिक जिमखानाच्या गोलंदाजीसमोर केन्सिंगटनचा डाव केवळ ५३ धावांत संपला. यात दिव्येश साळवेने ४ तर रणवीर रोकडे व तिर्थक खैरनारने प्रत्येकी ३ बळी घेतले. फॉलोऑन न देता नाशिक जिमखानाने दुसऱ्या डावात ५ बाद ५८ वर डाव घोषित करून केन्सिंगटनला विजयासाठी २५५ धावांचे आव्हान दिले. केन्सिंगटनच्या साई थोरातने ३ व वीर मतेने २ बळी घेतले. दुसऱ्या डावात ही नाशिक जिमखानाच्या गोलंदाजांनी केन्सिंगटनला केवळ ३८ धावांत गुंडाळले. दिव्येश साळवे व रणवीर रोकडेने प्रत्येकी ५ बळी घेत संघाला २१६ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. नाशिक जिमखानाचे डावखुरे फिरकी गोलंदाज दिव्येश साळवेने सामन्यात ९ तर रणवीर रोकडेने ८ बळी घेतले. नाशिक जिमखाना संघाला प्रशिक्षक संजय मराठे यांचे मार्गदर्शन लाभत असते. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांनी विजेत्या नाशिक जिमखाना संघ व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV