
नवी दिल्ली, 12 जून (हिं.स.)। ओमानच्या किनाऱ्याजवळ पळाऊ ध्वज असलेल्या ‘एमटी सेटेबेलो’ या तेलटँकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने भारतीय खलाशी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या तातडीच्या मदतीसाठी 24 तास कार्यरत राहणारे हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
केंद्रीय बंदर, जहाजराणी आणि जलमार्ग मंत्रालयाने जारी केलेले हेल्पलाइन क्रमांक असे आहेत: व्हॉट्सएप कॉल (एमएमडीएसी): +91 8657549760, पर्यायी क्रमांक: +91 2222613606, +91 8657549752, तक्रार निवारण चॅनेल (देशांतर्गत टोल-फ्री): 1800-889-7768, आंतरराष्ट्रीय टोल-फ्री क्रमांक: +1-888-988-0256 आणि तक्रार निवारण व्हॉट्सएप कॉल: +91 8655856830.
मंत्रालय आपल्या जहाजराणी महासंचालनालयाच्या (डीजीएस) माध्यमातून होर्मुझ सामुद्रधुनी, ओमानची खाडी आणि त्याच्या आसपासच्या संवेदनशील सागरी क्षेत्रांतील हालचालींवर 24 तास काटेकोर नजर ठेवून आहे. 10 जून रोजी ओमानच्या सोहरपासून सुमारे 20 समुद्री मैल ईशान्येला असलेल्या ‘एमटी सेटेबेलो’ या मध्यम पल्ल्याच्या तेल टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. या जहाजावर एकूण 28 कर्मचारी होते, त्यापैकी 24 भारतीय नागरिक होते. या दुर्घटनेत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून, इतर सर्व कर्मचारी सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहेत.
जहाजराणी महासंचालनालयाने संघर्षग्रस्त सागरी क्षेत्रांतून मार्गक्रमण करणाऱ्या भारतीय तसेच विदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर कार्यरत सर्व भारतीय नाविकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सरकारने जहाज ऑपरेटर आणि शिपिंग कंपन्यांनाही समुद्री सुरक्षानियमांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांवर बारीक लक्ष ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याची तातडीने जहाजराणी महासंचालनालयाला माहिती द्यावी, जेणेकरून परिस्थितीवर तत्काळ उपाययोजना करता येईल.
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की भू-राजकीय अनिश्चिततेच्या या कठीण काळात ती देशातील खलाशी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत ठामपणे उभी आहे आणि त्यांच्या सुरक्षा व सलामतीची खात्री करण्यासाठी पूर्णतः कटिबद्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule