भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेकडे नोंदवला निषेध
ओमान किनाऱ्यावर 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूचे प्रकरण नवी दिल्ली, 12 जून (हिं.स.) : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन मिशनचे कार्य
संग्रहित


ओमान किनाऱ्यावर 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूचे प्रकरण

नवी दिल्ली, 12 जून (हिं.स.) : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन मिशनचे कार्यवाहक प्रमुख जेसन मीक्स यांना पाचारण करून या घटनांविरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच, एका हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या तीन भारतीय खलाशांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे.

ओमानच्या किनाऱ्याजवळ गुरुवारी आणखी एका व्यापारी जहाजावर हल्ला करण्यात आला. या जहाजावर 20 भारतीय कर्मचारी कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त केली असून अशा हल्ल्यांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना बोलावून घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात अमेरिकन मिशनला पाचारण करण्याची ही दुसरी वेळ आहे.

सागरी मार्गांवरील वाढत्या धोक्यामुळे भारताने जहाजे आणि निरपराध खलाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली आहे.दरम्यान, एका हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या तीन भारतीय खलाशांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर भारताने स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असून अशा प्रकारचे हल्ले कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत.

विशेष म्हणजे, सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या जहाजावर झालेला हा सलग तिसरा हल्ला आहे. यापूर्वीही ओमान किनाऱ्याजवळ झालेल्या एका कारवाईत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता.या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर खाडी प्रदेशातील सागरी मार्गांचा वापर करणाऱ्या भारतीय नागरिक आणि खलाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित भारतीय दूतावास संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून प्रभावित खलाशांची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande