
सोलापूर, 12 जून (हिं.स.)।
सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या १२ पैकी ९ नगरसेवकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या घडामोडीमुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
या बैठकीस आमदार समाधान आवताडे, माजी आमदार रामभाऊ सातपुते, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत, मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रशांत गीड्डे, संतोष सुळे, श्याम गोगाव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
पंढरपूर नगरपालिकेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत भगीरथ भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना थेट आव्हान दिले होते. त्यानंतर १२ एप्रिल रोजी भगीरथ भालके आणि नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.प्रवेशानंतर आयोजित मेळाव्यात भगीरथ भालके यांनी जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगरसेवक शिंदे गटासोबत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल सावंत यांच्या निवासस्थानी झालेल्या महायुतीच्या बैठकीला भगीरथ भालके अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.दरम्यान, या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे पंढरपूरमधील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळत असून, विधान परिषद निवडणुकीत महायुतीची ताकद अधिक वाढल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड