
सोलापूर, 12 जून (हिं.स.)।
सीना-कोळेगाव धरणातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याच्या मागणीला वेग आला असून, या संदर्भात माढा तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तहसीलदार संजय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरणचे अधिकारी, उपोषणकर्ते मुन्ना साठे तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.बैठकीत सीना-कोळेगाव धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. धरणातील पाणी गरजू भागांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक नियोजन आणि वितरण व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. विशेषतः कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनाही पुरेसे पाणी मिळावे यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.पाणी उपसा केंद्रे आणि कालव्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वीजपुरवठ्याच्या अनुषंगाने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. पाणी सोडण्याच्या कालावधीत संबंधित केंद्रांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया, पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच कालव्यांची साफसफाई आणि दुरुस्तीची माहिती बैठकीत दिली.धरणातून सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी महसूल, पाटबंधारे आणि महावितरण या तीनही विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठ्याच्या मागणीबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड