अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांची बैठक
कोल्हापूर, 12 जून (हिं.स.)। केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या संभाव्य कोल्हापूर दौऱ्याच्या अनुषंगाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री महोदय, खासदार, आमदार तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक भा.ज.पा. कार्यालय, नागाळापार्क,
महायुतीचे नेते, कार्यकर्ते यांची बैठक


कोल्हापूर, 12 जून (हिं.स.)। केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या संभाव्य कोल्हापूर दौऱ्याच्या अनुषंगाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री महोदय, खासदार, आमदार तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक भा.ज.पा. कार्यालय, नागाळापार्क, कोल्हापूर येथे संपन्न झाली.

या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या प्रस्तावित दौऱ्याचे नियोजन, स्वागताची रूपरेषा, सुरक्षा व्यवस्था, कार्यक्रम स्थळांची तयारी, वाहतूक व्यवस्थापन तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दौरा यशस्वी आणि सुव्यवस्थित पार पडावा यासाठी प्रत्येक घटकाची बारकाईने पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध विषय, प्रलंबित प्रकल्प, पायाभूत सुविधांचा विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि जनहिताच्या योजनांबाबतही विचारविनिमय करण्यात आला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक निधी व प्रकल्प मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस उपस्थित मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक त्या जबाबदाऱ्या स्वीकारून समन्वयाने काम करण्याची भूमिका मांडली. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी आ. राजेश क्षीरसागर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, आ. चंद्रदीप नरके, आ. राहुल आवाडे, आ. अशोकराव माने(बापू), महापौर रूपाराणी निकम, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, समरजीत घाटगे, माजी आ. प्रकाश आवाडे, उपमहापौर अक्षय जरग आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande