
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे बैठक
नाशिक, 12 जून (हिं.स.) : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर भाविक आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासह सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने शिर्डी येथे आज पर्यटनविषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देश-विदेशात प्रसिद्धी यासंदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीच्या सद्यस्थितीचे सादरीकरण केले. यामध्ये सुरू असलेले नियोजन, प्रस्तावित पायाभूत सुविधा, विविध विभागांमधील समन्वय आणि कुंभमेळ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. नाशिक विभागीय आयुक्त तथा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम हे बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. शिर्डी येथील बैठकीस श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एमटीडीसी नाशिकचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन संचालनालय नाशिकचे उपसंचालक नंदकुमार राऊत, श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिंहस्थ काळात येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी टेंट सिटी, सांस्कृतिक केंद्रे, इंटरप्रिटेशन सेंटर, डिजिटल अनुभव केंद्रे आणि प्रदर्शन सुविधा विकसित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, पारंपरिक कला आणि स्थानिक कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कलाग्राम/कल्चरल हाट उभारणीवर विशेष भर देण्यात आला.पर्यटक सुविधा केंद्रे, डिजिटल सेवा, बहुभाषिक मदत व्यवस्था आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधांच्या नियोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
'इन्क्रेडिबल इंडिया' अंतर्गत सिंहस्थ कुंभमेळ्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी, पर्यटन सर्किट, विविध पर्यटन स्थळांमधील कनेक्टिव्हिटी तसेच हेली-टुरिझमसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली.
पर्यटन क्षेत्राशी संबंधित घटकांचे प्रशिक्षण, क्षमता वृद्धी आणि मागील कुंभमेळ्यांमधील यशस्वी उपक्रमांचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबतही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.
केंद्रीय पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र शासन, एमटीडीसी, पर्यटन संचालनालय आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांच्या समन्वयातून सिंहस्थ कुंभमेळा २०२७ भाविकांसाठी सुरक्षित, सुलभ आणि अविस्मरणीय करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV