मंजूर निधी असूनही रस्ता-पूल रखडला; चितनरवाडी ग्रामस्थांची काम पूर्ण करण्याची मागणी : आंदोलनाचा इशारा
परभणी, 12 जून (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील चितनरवाडी येथील रस्ता व ओढ्यावरील पूल बांधकामासाठी शासनाकडून दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेला निधी अद्याप खर्च न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उपरोधिक पद्धतीने तहसीलदारांना निव
मंजूर निधी असूनही रस्ता-पूल रखडला; चितनरवाडी ग्रामस्थांची काम पूर्ण करण्याची मागणी : आंदोलनाचा इशारा


परभणी, 12 जून (हिं.स.)।

जिंतूर तालुक्यातील चितनरवाडी येथील रस्ता व ओढ्यावरील पूल बांधकामासाठी शासनाकडून दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेला निधी अद्याप खर्च न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उपरोधिक पद्धतीने तहसीलदारांना निवेदन सादर केले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावकर्यांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार वर्षांपासून गावातील रस्ता व पूल बांधकामासाठी उलगुलान आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने सातत्याने लढा दिला जात आहे. पावसाळ्यात गावालगतच्या ओढ्याला पूर येत असल्याने परिसर जलमय होतो. ओढे-नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे नागरिक, विद्यार्थी, महिला, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. रस्ता व पूल बांधकामासाठी निधी उपलब्ध असूनही संबंधित यंत्रणेकडून कामे सुरू करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मागील चार वर्षांपासून विविध शासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाला उपरोधिक इशारा दिला आहे. निवेदनात रस्ते व पूल उपलब्ध करून देण्याऐवजी नागरिकांना मोफत पोहण्याचे प्रशिक्षण, लाईफ जॅकेट, दोरखंड तसेच अन्य बचाव साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, ही मागणी प्रतीकात्मक असून मंजूर निधी तातडीने खर्च करून रस्ता व पूल बांधकाम पूर्ण करावे, हीच ग्रामस्थांची मुख्य मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अन्यथा पावसाळ्यात घडणार्या कोणत्याही दुर्घटनेस संबंधित विभाग व प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. हे निवेदन विठ्ठल जाधव व चितनरवाडी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार, जिंतूर यांना सादर करण्यात आले. दोन आठवड्यांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, परभणी यांच्या दालनात ‘जवाब दो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande