सोलापुरात ६५ टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविलेले नाहीत
सोलापूर, 12 जून (हिं.स.)। सोलापूर शहरातील वीज वितरण व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. शहरात महावितरणचे सुमारे दोन लाख ४७ हजार ग्राहक असून, भविष्यात सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर
meter


सोलापूर, 12 जून (हिं.स.)।

सोलापूर शहरातील वीज वितरण व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनविण्यासाठी महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. शहरात महावितरणचे सुमारे दोन लाख ४७ हजार ग्राहक असून, भविष्यात सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविणे आवश्यक होणार आहे. वीजचोरी आणि वीज गळती रोखण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असली तरी सध्या ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करण्यात आलेली नाही.महावितरणच्या माहितीनुसार, शहरातील सुमारे एक लाख ५२ हजार ग्राहकांनी अद्याप स्मार्ट मीटर बसविलेले नाहीत. या ग्राहकांची परिसरनिहाय माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून त्यानुसार पुढील नियोजन केले जाणार आहे.स्मार्ट मीटर आणि ‘टाईम ऑफ डे’ यंत्रणा वापरणाऱ्या ग्राहकांना दिवसा सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत वापरलेल्या विजेवर प्रतियुनिट ९० पैशांची सवलत दिली जात आहे. असे असतानाही शहरातील ६५ टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी स्मार्ट मीटर स्वीकारलेले नाहीत.स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढते किंवा मीटर अधिक वेगाने चालते, अशा विविध शंका ग्राहकांच्या मनात आहेत. या शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणने विशेष उपाययोजना हाती घेतली आहे. ज्या ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत शंका आहे, त्यांच्या घरी स्मार्ट मीटरसोबतच एक स्वतंत्र स्टॅण्डर्ड मीटरही बसविण्यात येणार आहे. दोन्ही मीटरच्या नोंदींची तुलना करून ग्राहकांची खात्री पटविण्यात येईल. ग्राहकांची शंका दूर झाल्यानंतर हे स्टॅण्डर्ड मीटर काढून घेतले जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वीज व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा महावितरणचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande