अमरावतीत १४ गटशिक्षणाधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस
वेतन देयके वेळेत सादर न केल्याने सीईओ सत्यम गांधी यांची कारवाईअमरावती, 12 जून (हिं.स.)। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला अदा व्हावे. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील १४ पंचा
१४ गटशिक्षणाधिकाऱ्यांना 'शो कॉज'


वेतन देयके वेळेत सादर न केल्याने सीईओ सत्यम गांधी यांची कारवाईअमरावती, 12 जून (हिं.स.)। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला अदा व्हावे. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकाचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. वेतन देयके वेळेत सादर करण्यात वारंवार दिरंगाई होत असल्याने मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यम गांधी यांच्या निर्दे शानुसार संबंधित १४ गटशिक्षणाधिकाऱ्यांना शो कॉज बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्गातीलकर्मचाऱ्यांचे वेतन नियमित व वेळेत अदा व्हावे. यासाठी शिक्षण विभागाने वेतन देयके सादर करण्याचे स्पष्ट वेळापत्रक निश्चित केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना व सक्त निर्देशही देण्यात आले होते. मात्र, यानंतरही काही पंचायत समित्यांकडून वेतन देयके विहित मुदतीत सादर केली जात नसल्याचे निदर्शनास आले. प्रशासकीय निष्काळजीपणा आणि उदासीनतेमुळे वेतन प्रस्ताव वेळेत न आल्याने प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला अदा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

परिणामी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून विविध शिक्षक संघटनांकडून आंदोलन, निवेदने तसेच समाज माध्यमांद्वारे प्रशासना विरोधात टीका केली जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या स्पष्ट आदेशांचे पालन न करणे, प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा करणे, शासकीय कार्यात अकार्यक्षमता दाखविणे आणि शिक्षकांच्या वेतन वितरणात विलंब होण्यास कारणीभूत ठरणे ही गंभीर बाब असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

वेतन देयके वेळेत सादर न झाल्याने जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत असून शिक्षकांच्या आंदोलनामुळे आणि समाजमाध्यमांवरील नकारात्मक चर्चेमुळे प्रशासनाची बदनामी होत असल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यावर संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून निश्चित मुदतीत खुलासा मागविण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली असून भविष्यात अशा प्रकारच्या दिरंगाईबाबत अधिक जबाबदारीने काम करण्याचा संदेश प्रशासनाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande