
सोलापूर, 12 जून (हिं.स.)। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरी भागातील गॅस एजन्सींचे ग्राहक ग्रामीण भागातही असल्याने सिलिंडर वितरणात मोठा विलंब होत असल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे. शहरातील ग्राहकांना नवीन सिलिंडरसाठी सुमारे २५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना दुसरा सिलिंडर मिळण्यासाठी तब्बल ४५ दिवसांची वाट पाहावी लागत आहे.दरम्यान, शहरातील काही गॅस कनेक्शनधारकांच्या नावावर सिलिंडर बुक करून ते जादा दराने हातगाडे चालक किंवा हॉटेल व्यावसायिकांना विकले जात असल्याचा आरोपही होत आहे.
शहरातील भजीपाव, वडापाव, चायनीज, मच्छी फ्राय यांसारख्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलिंडर वापरले जात असल्याने या आरोपांना बळ मिळत आहे.सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सुमारे ३,१७० रुपये असून घरगुती सिलिंडर सुमारे ९५० रुपयांना उपलब्ध आहे. या मोठ्या दरफरकामुळे घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर वाढल्याची चर्चा आहे.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबातील महिलांना गॅस जोडणी आणि अनुदानाचा लाभ दिला जातो.
सोलापूर जिल्ह्यात या योजनेच्या सुमारे पावणेदोन लाख महिला लाभार्थी आहेत. मात्र, आता वर्षातील नऊ सिलिंडरऐवजी केवळ चार सिलिंडरवरच अनुदान मिळणार असल्याने लाभार्थींमध्ये नाराजी आहे.याशिवाय राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उज्ज्वला आणि लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना दरवर्षी तीन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, शासन निर्णय झाल्यानंतरही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याची तक्रार लाभार्थी करत आहेत.सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सुमारे दोन लाख गॅस कनेक्शनधारक असून मोठ्या संख्येने ग्राहकांकडे दोन-दोन गॅस कनेक्शन आहेत. अशा ग्राहकांना साधारण ३५ दिवसांनंतर सिलिंडर मिळत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची अट अद्याप कायम असून ग्राहकांना त्याच प्रक्रियेद्वारे सिलिंडरची नोंदणी करावी लागत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड