
सोलापूर, 12 जून, (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील १५ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. सोलापूर शहरातील आठ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन, पंढरपूरमधील एक आणि सांगोला तालुक्यातील चार अशा एकूण १५ शाळांवर दंडात्मक कारवाई करून त्या तातडीने बंद करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिले आहेत.यासंदर्भात जुलै २०२५ ते ६ एप्रिल २०२६ या कालावधीत प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित गटशिक्षणाधिकारी आणि महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांना तब्बल दहा वेळा पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यानंतरही संबंधित शाळांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई न केल्यास त्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल, असे नमूद केले आहे. तसेच या अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित अधिकारीदेखील जबाबदार धरले जातील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.अनधिकृत शाळांच्या यादीत सोलापूर शहरातील नोबल विस्डम प्री-प्रायमरी स्कूल, ट्विंकल इंग्लिश मिडीयम स्कूल, नारायण ई-टेक्नो स्कूल, विष्णूपंत कोळे मेमोरिअल इंग्लिश मिडीयम स्कूल, इकरा इस्लामिक स्कूल अँड मक्तब स्कूल, श्री चैतन्य टेक्नो स्कूल, आर्यन वर्ल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल यांचा समावेश आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील एशियन इनोव्हेटिव्ह मॉडर्न स्कूल (वळसंग) आणि नाकेश करजगी ऑर्किड स्कूल (कंदलगाव), पंढरपूरमधील फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच सांगोला तालुक्यातील हनुमान इंग्लिश मिडीयम स्कूल, सांगोला गुरुकुल, बाळूमामा गुरुकुल आणि विश्वशोभा पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय या शाळाही अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.या शाळांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता असून विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश घेताना शाळेची मान्यता तपासूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड