
लातूर, 12 जून (हिं.स.)।
लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात योग-फिटनेस काकर्यशाळा उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना शरीराला मनाशी, मनाला श्वासाशी आणि श्वासाला निसर्गाशी जोडणारी कला म्हणजे योग आहे, असे प्रतिपादन सनराईज योगा स्टुडिओच्या संचालिका नंदिनी पडिले यांनी येथे केले.
जून महिना म्हटलं तर योगाचा महिना असं म्हणतात. कारण याच महिन्यात जागतिक योग दिवस असतो. त्या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव येथे जवळपास हजारो
प्रशिक्षणार्थी पोलिसांचा 'फिट इंडिया' अंतर्गत योगा आणि फिटनेसची कार्यशाळा सनराईज योगा स्टुडिओच्या
संचालिका नंदिनी पडीले यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत जवळपास हजार
प्रशिक्षणार्थी पोलीस तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगावचे अधिकारी आणि सनराईज योगा स्टुडिओच्या
महिला सदस्य या कार्यशाळेसाठी उपस्थित होत्या.
सगळ्यांचा वॉर्मअप, स्ट्रेचिंग, योगासने, प्राणायाम, मेडिटेशन, ध्यान हे सगळे यामध्ये घेण्यात आले. या कार्यशाळेच्या वेळी सनराईज योगा स्टुडिओच्या संचालिका नंदिनी पडीले म्हणाल्या, शरीराला मनाशी मनाला श्वासाशी आणि श्वासाला निसर्गाशी जोडणारी कला म्हणजे योगा आहे. प्रत्येक श्वासात दडलेल्या जीवनशक्तीला जाणून तिच्यावर नियंत्रण मिळवण्याची विद्या म्हणजे प्राणायाम आहे. आपल्याला राग आला की आपला श्वास चढतो. शांत झाला की श्वास हळू होतो,
मग श्वासावर ताबा मिळवला की मनावर आपोआप ताबा मिळवता येतो. प्राणायाम म्हणजे औषध नाही, तो जीवनाचा आधार आहे आणि तो योग्य पद्धतीने योग्य योगाचार्याच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis