
जळकोट तालुक्यात ३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
लातूर, 13 जून (हिं.स.)।लातूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, जिल्हा परिषद प्रशासनाकडून विविध उपाययोजना वेगाने राबविल्या जात आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात ३ टँकर आणि १५१ विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील केवळ जळकोट तालुक्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, तेथील ३ गावे आणि १ वाडी अशा एकूण ४ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. यामध्ये १ खाजगी आणि २ शासकीय मिळून एकूण ३ टँकर मंजूर करण्यात आले आहे. या टँकर्सच्या माध्यमातून मंजूर केलेल्या ६ खेपांनुसार प्रत्यक्ष पाणीपुरवठा केला जात आहे.जळकोट तालुक्यातील शिवाजी नगर तांडा व वाघमारी तांडा येथे १० एप्रिल २०२६ पासून आणि गव्हाण येथे २४ एप्रिल २०२६ पासून टँकर मंजूर करण्यात आले असून, वंजारवाडा येथे १ जून २०२६ पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सध्या टँकरसाठी ३ आणि टँकरव्यतिरिक्त इतर पाणीपुरवठ्यासाठी १४८ अशा एकूण १५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण १२५ गावे व वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ५२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, त्याखालोखाल औसा तालुक्यात ३५, जळकोट तालुक्यात १५, निलंगा तालुक्यात १३, उदगीर तालुक्यात ११, रेणापूर तालुक्यात ८, चाकूर तालुक्यात ५, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ६, लातूर तालुक्यात व देवणी तालुक्यात प्रत्येकी ३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis