
अकोला, 13 जून (हिं.स.)। महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख व परिणामकारक व्हावे यासाठी राज्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक व विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात येत आहेत.
एकल महिलांच्या समस्या केवळ मांडण्याऐवजी त्या समस्यांवर शासनामार्फत कोणत्या ठोस उपाययोजना राबविता येतील, कोणत्या नवीन योजना सुरू करता येतील, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत तसेच आवश्यक असल्यास कायदे व नियमांमध्ये कोणत्या सुधारणा कराव्यात याबाबत सविस्तर सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सूचना पाठविताना केवळ संक्षिप्त मते न पाठविता संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी आणि अपेक्षित परिणाम यांचा समावेश असलेले सविस्तर प्रस्ताव सादर करावेत. समाजातील एकल महिला तसेच सर्व संबंधित घटकांचा सक्रिय सहभाग या धोरण निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाचा असल्याने सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सूचना व अभिप्राय पाठविण्यासाठी शासनामार्फत खालील अधिकृत व्हॉट्सऍप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे :
अधिकृत व्हॉट्सऍप क्रमांक : ८२०८५८९१९५ वर संपर्क साधा.
प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करताना योग्य तो विचार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व विषयतज्ज्ञ यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री लक्ष्मण हगवने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अकोला यांचे कडून करण्यात आले आहे.सूचना व अभिप्राय सादर करण्याची अंतिम तारीख २५ जून २०२६ आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे