“भारत बाजारपेठ नव्हे, महासत्ता म्हणून उदयास” — आ. रणधीर सावरकर
अकोला, 13 जून (हिं.स.) : गेली अनेक वर्षे जगातील देश भारताकडे केवळ एक बाजारपेठ म्हणून पाहत होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या 12 वर्षांतील विश्वास, विकास आणि जनकल्याणाच्या कार्यामुळे देशाबाबतचा जागतिक दृष्टिकोन बदलला असून भा
“भारत बाजारपेठ नव्हे, महासत्ता म्हणून उदयास” — आ. रणधीर सावरकर


अकोला, 13 जून (हिं.स.) : गेली अनेक वर्षे जगातील देश भारताकडे केवळ एक बाजारपेठ म्हणून पाहत होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या 12 वर्षांतील विश्वास, विकास आणि जनकल्याणाच्या कार्यामुळे देशाबाबतचा जागतिक दृष्टिकोन बदलला असून भारत आता महासत्ता म्हणून उभा राहत आहे, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी आज येथे केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्ती पर्वानिमित्त अकोला येथे आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील विविध योजना आणि कामगिरीचा आढावा सादर केला.

आमदार सावरकर म्हणाले की, “हे कोणतेही सेलिब्रेशन नाही, तर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा हिशेब देण्याचा प्रयत्न आहे.” लोकशाहीत मतदार राजा हा सर्वात महत्त्वाचा असून त्याला आपल्या कामाचा लेखाजोखा देणे हे कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, “सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” या धोरणातून सरकारने सर्वसमावेशक विकास साधला आहे. डिजिटल व्यवहारांच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक पारदर्शकता आली असून सुमारे 4 लाख 31 हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा त्यांनी केला.

त्यांनी विविध सरकारी योजनांचा उल्लेख करताना सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेत 4 कोटींहून अधिक कुटुंबांना घरे, उज्ज्वला योजनेत 12 कोटींहून अधिक महिलांना गॅस कनेक्शन, तर 16 कोटी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आयुष्मान भारत योजनेतून 60 कोटींहून अधिक आरोग्य कार्ड वितरित करण्यात आले असून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजना, लखपती दीदी योजना, सुकन्या समृद्धी योजना तसेच ग्रामीण रस्ते व राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासह अनेक उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.

देशातील सुरक्षा व धोरणात्मक कारवायांचा उल्लेख करताना त्यांनी सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि विविध ऑपरेशन्सद्वारे भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका अधिक मजबूत झाल्याचे नमूद केले. तसेच नक्षलवाद नियंत्रणात मोठे यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande