अकोला: युरियासाठी आता सात बाऱ्याची अट रद्द...
अकोला, 13 जून (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते. युरियाच्या संभाव्य टंचाईच्या भीतीने शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर रांगा लावत होते. सुरुवातीला क
अकोला: युरियासाठी आता सात बाऱ्याची अट रद्द...


अकोला, 13 जून (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते. युरियाच्या संभाव्य टंचाईच्या भीतीने शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर रांगा लावत होते. सुरुवातीला केवळ आधार कार्डच्या आधारे युरिया वितरण सुरू करण्यात आले होते. मात्र, केवळ आधार कार्डवर खत विक्री झाल्यास साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची शक्यता असल्याची चिंता शेतकऱ्यांसह विविध स्तरांतून व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने आधार कार्डसोबत ७/१२ उतारा सादर करणे अनिवार्य केले होते.

मात्र अनेक शेतकऱ्यांना ७/१२ उतारा सादर करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नव्याने सुधारित आदेश जारी करत ७/१२ उताऱ्याची अट रद्द केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, युरिया व डीएपी खत विक्रीवेळी आता खरेदीदाराची ओळख पटविण्यासाठी केवळ आधार कार्डची प्रत अथवा आधार क्रमांक नोंदविणे पुरेसे राहणार आहे. खत विक्री केंद्रांनी प्रत्येक विक्रीची नोंद अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच एका शेतकऱ्याला हंगामी गरज लक्षात घेऊन प्रति फेरी किमान १ ते कमाल ५ बॅग युरिया किंवा डीएपी खत देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. कोणत्याही एका व्यक्तीला प्रमाणाबाहेर खत विक्री करता येणार नाही. साठेबाजी, गैरव्यवहार किंवा काळाबाजार आढळून आल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande