
नांदेड, 13 जून (हिं.स.)।
ढवळे कॉर्नर परिसरातील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार कामगार विभागाने पोलिस विभागाच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करून संबंधित अल्पवयीन मुलांची सुटका केली. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
बालकामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा अधिनियम 2016 नुसार 14 वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात अथवा प्रक्रियेत कामावर ठेवणे दंडनीय गुन्हा आहे. तसेच 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक व्यवसायांमध्ये रोजगार देण्यास मनाई आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नियोक्त्यांवर कारावास व दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
कामगार विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही बालकामगार आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ कामगार विभाग, पोलिस विभाग किंवा संबंधित प्रशासनाला द्यावी. बालकामगारमुक्त समाज निर्मितीसाठी सर्व घटकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सहायक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis